हैदराबाद - तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे लपवून ठेवण्यामुळे मलेशियाच्या सहा नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्यावर व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलेशियातील सहा नागरिक पर्यटन व्हिसावर हैदराबादमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीमधील निझामुद्दीन मरकझ कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाहून परतल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाला त्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि मरकझ कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे लपवून ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, गांधी रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे अहवाल येणे बाकी असल्याची माहिती मिळत आहे.
तेलंगाणामध्ये तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सहा लोकांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर, तेलंगाणा सरकारने असे जाहीर केले होते, की जे लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी स्वतः याबाबत माहिती द्यावी. सरकार या लोकांच्या चाचण्यांचा आणि उपचारांचा पूर्ण खर्च उचलेल, असेही राज्य सरकारने जाहीर केले होते.
हेही वाचा : गुजरात : कोरोनामुळे 14 महिन्याच्या बाळाचा मृत्यू...