लखनऊ - उत्तर प्रदेशच्या गाझियापूरचे खासदार अफजल अन्सारी यांनी अजानवरील बंदी मागे घेण्याची मागणी केली आहे. राज्य उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहीत त्यांनी ही मागणी केली आहे. गाझियापूरच्या जिल्हा न्यायाधीशांनी अजानवर बंदी आणली होती.
मुस्लीम लोकांना सेहरी आणि इफ्तारच्या वेळा माहिती करून देण्यासाठी अजान मोलाची भूमिका बजावते. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्यामुळे, ही बाब मुस्लीम बांधवांसाठी महत्त्वाची आहे. तसेच, अजानसाठी केवळ एकाच व्यक्तीची उपस्थिती आवश्यक असते, त्यामुळे ती पुन्हा सुरू केल्यास लॉकडाऊनच्या नियमांचाही भंग होणार नसल्याचे अन्सारी यांनी या याचिकेमध्ये म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे, अन्सारी सध्या दिल्लीमध्ये अडकले आहेत. त्यांनी आपल्या पत्रामध्ये हेदेखील नमूद केले आहे, की मुस्लीम बांधव हे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करतच, आपापल्या घरांमधून रमजान साजरा करत आहेत. सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करत लोक मशिदीमध्ये किंवा कोणत्याही धार्मिक स्थळी एकत्र जमा होणे टाळत आहेत.
अन्सारी पुढे म्हणाले, की २४ एप्रिलपासून गाझियाबादमधील मशिदींमधील अजान बंद करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाने लेखी नव्हे, तर केवळ तोंडी सूचना दिली आहे. तसेच, यादरम्यान कोणी अजानला उपस्थित राहिले, तर त्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जातो आहे. यासंदर्भात मी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही.
हेही वाचा : वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोबोटची मदत