नवी दिल्ली - देशभरातील बीएसएनल कर्मचारी संघटनांनी आज (सोमवार) देशव्यापी उपोषणाचा इशारा दिला आहे. बीएसएनएल कंपनी ही इच्छानिवृत्ती घेण्यासाठी कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव आणत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.
बीएसएनएलचे अर्ध्याहून अधिक कर्मचारी या संघटनांमध्ये सहभागी आहेत. त्यांचा आरोप आहे, की कंपनी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांवर इच्छानिवृत्ती योजनेमध्ये (व्हीआरएस) सहभागी होण्यासाठी दबाव आणत आहे. तसे न केल्यास, कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय हे ५८ वर्षांपर्यंत कमी करण्याच्या, आणि लांबवर बदली करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप या कर्मचारी संघटना करत आहेत.
व्हीआरएससाठी नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन कम्युटेशन मिळणार नाही. याद्वारे, कर्मचाऱ्यांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर १५ वर्षांपर्यंत मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेचा एक तृतियांश भाग आगाऊ मिळणार होता. कर्मचाऱयांचे असे म्हणणे आहे, की काही वर्षांपूर्वी बँकांकडे यापेक्षा चांगल्या योजना मिळत होत्या. बीएसएनएलची ही योजना कर्मचाऱ्यांसाठी म्हणावी तितकी उपयोगी नाही.
बीएसएनएलचे संचालक आणि एम.डी. पी. के. पुरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनलच्या १.६ लाख कर्मचाऱ्यांपैकी ७७ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनी व्हीआरएससाठी नोंदणी केली आहे. मात्र एका कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जर कंपनीने कर्मचाऱ्यांना धमकावणे बंद केले, तर व्हीआरएससाठी नाव नोंदवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होईल.
कंपनीच्या वार्षिक उत्पन्नाच्या ७५-८० टक्के वाटा हा कर्मचारी लाभ खात्यांचा आहे. जर ७० ते ८० हजार कर्मचाऱ्यांनी इच्छानिवृत्ती घेतली, तर कंपनीची साधारणपणे ७ हजार कोटींची बचत होईल. हे लक्षात घेऊन बीएसएनएल कर्मचाऱ्यांना व्हीआरएसमध्ये नाव नोंदवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
हेही वाचा : BSNL च्या तब्बल 75 हजार कर्मचाऱ्यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती