श्रीनगर - काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेवरुन पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरू होता. बीएसएफ जवानांनी हा प्रयत्ना हाणून पाडताना घुसखोराला ठार केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एक ६० वर्षीय घुसखोर एस.एम पुरा सीमा चौकीजवळ असलेल्या भारतीय हद्दीत दाखल होण्याचा प्रयत्न करत होता. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी घुसखोराला हेरल्यानंतर आत्मसमर्पण करण्यास सांगितले. परंतु, अधिकाऱ्यांनी ताकीद देऊनही घुसखोर भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे, बीएसएफच्या जवानांनी घुसखोराला गोळ्या झाडून ठार केले.
घुसखोराचा मृतदेह एस.एम पुरा चौकीमध्ये ठेवण्यात आला आहे. याप्रकरणाची पुढील चौकशी बीएसएफकडून केली जात आहे.