कोलकाता - अवैधरित्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन बांगलादेशींना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवरील २४ परगाना जिल्ह्यात बीएसएफने कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बीएसएफच्या गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार कंपनी कमांडर शंभू बैद्य यांनी रंनघाट सीमा छावणीजवळ ही कारवाई केली. आज(मंगळवार) सकाळी दोन महिलांसह एका बांगलादेशी पुरुषाला अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून तिघेजण सीमेवरील रंनघाट या गावात चालले होते. अटक केलेल्यांपैकी एक महिला आणि पुरुष विवाहित जोडपे असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. उत्तर प्रदेशात काम करण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या महिलेने पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यात पतीकडे जात असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. तिघांनाही बगदाह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बीएसएफने या प्रकरणी आणखी एका मदत करणाऱ्या हस्तक महिलेलाही अटक केली आहे.