नवी दिल्ली - मागील चार महिन्यांपासून भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढला आहे. पूर्व लडाखमधील अनेक भागांत चीनकडून घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत लष्कराची सज्जता अंत्यत महत्त्वाची आहे. सीमेवर तणाव असतानाच लष्कराने सीमा भागातील रस्ते बांधकामाला वेग दिला आहे.
लष्कराच्या सीमा रस्ते विभागाने (बीआरओ) लेहला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. लष्कराची अवजड सामुग्री, शस्त्रास्त्रे आणि हालचाली सुलभ होण्यासाठी रस्त्यांचे काम जलद करण्यात येत आहे. आधीच लष्कारने सीमेवर रणगाडे आणि इतर युद्धासाठीची सामुग्री हलवली आहे. कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराकडून सतत आढावा घेण्यात येत आहे.
लेहला जोडणाऱ्या रस्त्यावरील दरडी काढण्यात येत असून खराब रस्त्यांची डागडूजीही सुरू आहे. चिनी अतिक्रमण आणि घुसखोरीमुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत भारतीय लष्कर सज्ज राहण्यासाठी रस्त्यांची डागडुजी आणि बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
लाखो रुपये खर्च करून लष्कराने डोंगराळ भागात रस्ते बनविण्यासाठी अवजड अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदी केली आहे. खडक, डोंगर फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्फोट करण्यात येत आहेत. जलद रस्ते बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लेहला हलविण्यात आले असून नॉनस्टॉप काम सुरू आहे. सुटीच्या दिवशीही काम सुरू असून जलद रितीने सीमा भागातील रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत आहे.
'सध्याच्या स्थितीत लष्कराला अवजड वाहने आणि सामुग्री सीमाभागात घेऊन जाण्यासाठी मदत व्हावी म्हणून रस्ते बनविण्यासाठी आधुनिक यंत्रे वापरण्यात येत आहेत. डोंगर फोडून रस्ता बनविण्याचे काम सुरू असून नव्या यंत्रामुळे काम करतानाचा धोकाही कमी झाला आहे', असे बी. किशन, बीआओ, ८१ च्या कमांडीग ऑफिसरने सांगितले.
नव्या यंत्रामुळे सीमेवरील रस्ते निर्माणाचा वेग १० पटीने वाढला आहे. अधिक गतीने आम्ही रस्ते बनवू शकत आहोत. सध्याच्या परिस्थितीत याचा जास्त फायदा होत आहे. लष्कराच्या मागणीनुसार बीआरओकडून रस्ते बांधण्यात येत आहेत. महामार्ग १ हा लडाखला जोडण्यात आला आहे. त्यामुळे लष्काराच्या हालचाली जलद गतीने होणार आहेत. भारताने सीमेवर बनविलेल्या अनेक रस्त्यांना चीनने आक्षेप घेतला आहे. मात्र, भारताने रस्ते बांधकाला गती दिली आहे.