सुरत - सुरतमध्ये एका 41 वर्षीय मेंदू मृत महिलेने आपले हृदय, फुफ्फुस, यकृत, दोन्ही मूत्रपिंडे आणि डोळे दान केले आहेत. वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या 7 लोकांना यातून जीवदान तसेच, जीवनातील सुसह्यता मिळाली आहे. ईलाबेन पटेल असे या मेंदू मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
कोसड येथील रहिवासी ईलाबेन 27 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता अचानकपणे घरातच खाली कोसळल्या आणि बेशुद्ध झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांनंतर डॉक्टरांनी त्यांचा मेंदू मृत झाल्याचे जाहीर केले.
'ईलाबेन यांच्या जाण्यामुळे मोठा दुःखद प्रसंग ओढवलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्यांची मुले तन्वीर आणि आर्यन यांना भेटलो. त्यांना प्रक्रियेची माहिती दिली आणि त्यांच्या संमतीने किडनी रोग संस्था रिसर्च सेंटर (आयकेडीआरसी), अहमदाबाद येथील अवयव व ऊती प्रत्यारोपण संघटनेच्या संयोजक डॉ. प्रांजल मोदी यांना कळवले,' असे शहरातील मृतदेहदानाशी संबंधित 'डोनेट लाइफ'चे संस्थापक नीलेश मंडलेवाला म्हणाले.
'आम्ही आमच्या आईच्या अकाली निधनाचे क्रूर नशीब स्वीकारले. आम्हाला माहीत होते की, ती त्या अवस्थेतून परत येणार नाही आणि म्हणून अवयवदान करून इतर सात जणांचे अनमोल जीवन वाचवण्याचा आणि यातूनच तिला श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय आम्ही घेतला,' असे शेतकरी असलेला मुलगा तन्वीर पटेल म्हणाला.
'चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दिल्ली येथील 15 वर्षांच्या मुलीमध्ये ईलाबेनच्या हृदयाचे प्रत्यारोपण केले गेले. तर, चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात मुंबईतील 61 वर्षीय महिलेमध्ये फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्यात आले,' असे मंडलेवाला यांनी सांगितले. हे अवयव केवळ 180 मिनिटात हवाई मार्गाने चेन्नईला पाठवण्यात आले, असे ते म्हणाले.
हेही वाचा - भारतीय सैन्याने केली गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मारकाची निर्मिती
यापूर्वी, या अवयवांना विमानतळावर द्रुतगतीने नेण्यात मदत करण्यासाठी व्हीनस रुग्णालय ते सुरत विमानतळापर्यंत विशेष ग्रीन कॉरिडोर तयार केला गेला होता. आयकेडीआरसीच्या पथकाने दोन मूत्रपिंडे आणि यकृत शस्त्रक्रिया करू काढले तीदेखील विशेष ग्रीन कॉरिडॉरद्वारे अहमदाबादला पोहोचवली गेली.
"सुरत शहर, सुरत ग्रामीण, भरुच, वडोदरा ग्रामीण, आनंद, अहमदाबाद ग्रामीण आणि अहमदाबाद शहर यासह सात जिल्ह्यांतील पोलिसांच्या मदतीने हे अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी केवळ तीन तासात 261 किलोमीटर अंतरावर सुलभतेने नेण्यात आले. एक मूत्रपिंड सुरत येथील 18 वर्षीय तरुणाला बसवण्यात आले. तर, दुसरे आनंद येथील एका 18 वर्षाच्या मुलीमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. ईलाबेन यांच्या यकृताचे आयकेडीआरसी येथे सुरत येथील 54 वर्षांच्या पुरुषात प्रत्यारोपण करण्यात आले. डोळे सुरतस्थित 'लोक दृष्टी बँके'त दान केले आहेत.
'आतापर्यंत गुजरातमधून 35 हृदये दान झाली आहेत. त्यापैकी 28 एकट्या सुरत आणि दक्षिण गुजरात प्रदेशातून दान केली गेली आहेत. आतापर्यंत 766 लोकांना या अवयव प्रत्यारोपणातून नवे आयुष्य मिळाले आहे,' असे ते पुढे म्हणाले.
हेही वाचा - आरपीएफने केली 14 मुलींची सुटका; एका महिलेला अटक