रायपूर - 'कोरोना' आणि 'कोविड' हे दोन शब्द ऐकल्यावरही जगभरातील लोकांचा सध्या थरकाप उडत आहे. मात्र रायपूरमधील एका दाम्पत्याने त्यांच्या जुळ्या मुलांना ही दोन नावे दिली आहेत. लॉकडाऊनदरम्यान या दाम्पत्याच्या घरी जुळ्यांचा जन्म झाला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांची नावे कोरोना आणि कोविड अशी ठेवली आहेत.
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाला लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊन दरम्यान छत्तीसगडमधील रायपूरच्या एका दाम्पत्याच्या घरी जुळी मुलं जन्मली आहे. लॉकडाऊनच्याकाळात त्यांना ज्या त्रासाला सामोरे जावे लागले, त्याची आठवण रहावी म्हणून त्यांनी जुळ्यांची नावे अशी ठेवल्याचे या दाम्पत्याने म्हटले आहे. हे तात्पुरत्या काळासाठी असून, भविष्यात आपल्या मुलांचे नाव आपण बदलणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
२६ मार्चच्या रात्री आम्हाला जुळी मुले झाली. यामधील मुलाचे नाव आम्ही कोविड आणि मुलीचे नाव कोरोना ठेवले आहे, अशी माहिती प्रीती वर्मा यांनी दिली. ही नावे एका घातक विषाणूची आहेत. मात्र, यानेच लोकांना स्वच्छतेबाबत जागरूक केले आहे. तसेच लॉकडाऊनमुळे महिलेला प्रसुतीदरम्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, त्यामुळे हा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचेही त्या म्हटल्या. आम्ही सुरूवातीला हास्यविनोदात या नवजात बालकांना कोविड आणि कोरोना म्हणालो होतो. मात्र नंतर रुग्णालयाचे कर्मचारीही त्यांना त्याच नावाने बोलवू लागले. त्यामुळे आम्ही त्यांना हेच नाव ठेवण्याचे निश्चित केले, असेही त्या म्हणाल्या.
२६ मार्चच्या रात्री मला अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. त्यानंतर आम्ही रुग्णवाहिकेला बोलावले. देशात लॉकडाऊन असल्यामुळे ठिकठिकाणी आम्हाला पोलीस अडवत होते. मात्र, माझी स्थिती पाहून आम्हाला पुढे सोडत होते. हा सर्व प्रकार पाहून आम्हाला रुग्णालयात काय होईल याची चिंता वाटत होती. मात्र, त्याठिकाणी पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयात या जुळ्यांचा जन्म झाला. रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शुभ्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार बाळ-बाळांतिणीची प्रकृती उत्तम असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा : तुम्ही घरी थांबाल तरच कोरोना हरेल, पाच वर्षाच्या चिमुकलीचा संदेश