जयपूर - राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीमध्ये बोट पलटल्याची घटना घडली आहे. या बोटीतून सुमारे ३० भाविक कमलेश्वर धामचे दर्शन करण्यासाठी जात होते. आतापर्यंत १५ लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे. तसेच, १२ मृतदेह नदीमधून काढण्यात आले आहेत.
कोटाचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शरद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. आतापर्यंत १५ लोकांना वाचवण्यात यश मिळाले असून, १४ लोक बेपत्ता आहेत. या लोकांची यादी पोलिसांनी जाहीर केली आहे. तसेच, १२ व्यक्तींचे मृतदेह नदीतून बाहेर काढला आहे, या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
एसडीआरएफचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता लोकांमध्ये बहुतांश महिला, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, लोकसभेचे सभापती ओम बिर्लांनी या घटनेची दखल घेतली आहे. लोकसभा सचिवालयाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत एसडीआरएफ पथकाला घटनास्थळी रवाना केले होते.