शिमला - काँग्रेस विरोधात निदर्शने करताना भाजप कार्यकर्त्यांनीच 'चौकीदार चोर है', अशी घोषणा दिल्यामुळे मोठी फजिती झाली. ही घटना हिमाचल प्रदेशच्या ऊना येथील आहे. भाजप अध्यक्ष सतपाल सत्ती यांच्या समर्थनात ते घोषणाबाजी करत होते. दरम्यान चुकून त्यांच्या तोंडून ही घोषणा निघाली ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
हिमाचल प्रदेशातील भाजप अध्यक्ष सतपाल सत्ती यांनी प्रियांका गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. सकाळपासूनच सत्ती यांच्या घरासमोर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ज्यामुळे संपूर्ण परिसराला छावनीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
असे असताना भाजप कार्यकर्त्यांनीही गड राखण्याची संपूर्ण तयारी केली होती. ते सत्तींच्या घरासमोर काँग्रेस विरोधात निदर्शने करत होते. दरम्यान त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पुतळाही जाळला. यावेळी भाजपच्या एका कार्यकर्त्याने चौकीदार नावाची घोषणा दिली. त्याच जोशाने उपस्थित कार्यकर्त्यांनी ही घोषणा समोर वाढवत 'चौर है', असे म्हटले. अनेवेळा या घोषणेचा पुनरुच्चार झाला. जोशा-जोशात होश गमावलेल्या कार्यकर्त्यांना आपली चूक लक्षात आल्यानंतर अचानक घोषणा थांबवून त्यांनी परत काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या या घोषणा कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
प्रियांका गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून निवडणूक आयोगाने सतपाल सत्ती यांच्या विरोधात कारवाई केली आहे. त्यांच्यावर ४८ तासांसाठी प्रचाराबंदीची कारवाई करण्यात आली आहे.