बंगळुरू - कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपा नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. हिंदूमधील कोणत्याही जातीच्या व्यक्तीला भाजपकडून तिकीट देण्यात येईल. मग ते लिंगायत, कुरूबा, वोक्कालिगा किंवा ब्राह्मण असोत. मात्र, भाजप कोणत्याही मुस्लीम व्यक्तीला तिकीट देणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य ईश्वरप्पा यांनी केले आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कर्नाटकच्या बेळगावमध्ये लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. बेळगाव हिंदूत्वाचे केंद्र आहे आणि हिंदू समर्थकालाच तिकीट दिले जाईल, असेही ते म्हणाले. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने विजयी घौडदौड कायम ठेवली. सिरा आणि राजराजेश्वरी नगर या दोन जागांवर निवडणूक घेण्यात आली होती. या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या. सिरा ही जागा भाजपाने पहिल्यांदा जिंकली. तर राजराजेश्वरी नगरमध्ये यापूर्वीही भाजपाने विजय मिळवला होता.
के. एस. ईश्वरप्पा हे कर्नाटकातील भाजापाचे वरिष्ठ नेते आहेत. ते 70 वर्षांचे असून कुरुबा समाजातील आहेत. यापूर्वीही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. कर्नाटकात भाजपाचे सरकार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी राज्याला कोरोनापासून देवच वाचवू शकतो, असे वक्तव्य केले होते.
हेही वाचा - देशात 4 लाख 46 हजार सक्रिय कोरोना रुग्ण; तर रिकव्हरी रेट 93.81 टक्के