नवी दिल्ली - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शासकीय निवासस्थान खाली केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच्या ट्वीटरवरून दिली. यापुढे माझा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांकही बदलले असल्याचे त्यांनी सांगितले. सुषमा स्वराज यांच्या या निर्णयानंतर त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्वराज यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या जागी जयशंकर प्रसाद यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. आता सुषमा यांनी त्यांचे शासकीय निवासस्थानही सोडले आहे. 'मी आता यापुढे ८ सफरदरजंग मार्ग, नवी दिल्ली या निवासस्थानी उपलब्ध असणार नाही. माझा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक बदलले आहेत,’ अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.
काही दिवसांपूर्वी त्यांना आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यांनी या वृत्ताचेही खंडन केले होते.