नवी दिल्ली - राजस्थानातील सद्यस्थिती आणि फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'राजस्थानात आणीबाणीची स्थिती नाही का? सर्वपक्षीय नेत्यांचे फोन टॅप होत आहेत का?, असा सवाल करत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसमधील घरातील युद्ध रस्त्यावर पोहोचले असून याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही पात्रा यांनी केली आहे.
काँग्रेसचा इतिहास फोन टॅपिंगचा आहे. काँग्रेस सरकार राजकीय नाट्य करत आहे, असेही पात्रा म्हणाले. खोट्या आणि असंवैधानिक पद्धतीने काम करून काँग्रेस सरकार चालवत असल्याची टीकाही पात्रा यांनी केली. 'काल स्वत: मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीच सांगितले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यादरम्यान १८ महिन्यांपासून संवाद होत नव्हता. ज्यांचा राजकारणाशी संबंध आहे अशा प्रत्येक व्यक्तीचा फोन टॅप होत आहे का, असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपच्या आधारे दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या आधारे सरकारचे मुख्य गटनेता जोशी यांनी एसओजीला दोन तक्रारी दिल्या. त्या आधारे एसओजीने एफआयआर नोंदविला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी केली जात आहे.