कोलकाता - नीती आयोगाची १५ जूनला बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. पंरतु, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नीती आयोगामध्ये भाग घेणे माझ्यासाठी व्यर्थ असल्याचे म्हणत बैठकीला जाण्यास नकार दिला होता. ममतांच्या या विधानावर बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी जोरदार टीका केली आहे.
बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश मजुमदार यांनी ममतांवर टीका करताना म्हटले आहे, की ममतांचा हा निर्णय देशविरोधी आहे. ममता देशविरोधी वर्तन करत आहेत. यासोबतच त्या बंगालला विकासापासून रोखत आहेत. संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुढे जात आहे. परंतु, ममता याला विरोध करत आहेत. याउलट, काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्रीही नीती आयोगाच्या बैठकीत भाग घेत आहेत. तृणमूल काँग्रेसनेही मजुमदार यांना उत्तर देताना म्हटले आहे, की राष्ट्रवाद आणि विकासाच्या मुद्यावर आम्हाला भाजप सारख्या सांप्रदायिक पक्षाकडून शिकण्याची गरज नाही.