नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने कोरोनाबाधितांची आणि मृत्यूची वास्तविक आकडेवारी सादर करण्याच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर निशाण साधला आहे. भाजप कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येवर घाणेरडे राजकारण करत आहे, असे सिसोदिया म्हणाले.
संवेदनशील विषयावर काही विरोधी नेत्यांनी सुरू केलेल्या राजकाराणाला दिल्ली उच्च न्यायालयाने थांबवले, याचा मला आनंद आहे, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले. तसेच दिल्ली सरकार दररोज कोरोनाशी संबंधित योग्य आकडेवारी देत असल्याचेही ते म्हणाले.
आरोग्य आणि मानवतावादी संकटाच्या वेळीही भाजपने घाणेरडे राजकारण करण्याचे निवडले. मृत्यूच्या आकडेवारीबाबत दिल्ली सरकारवर निराधार आरोप लावले, आपचे प्रवक्ते राघव चढ्ढा म्हणाले.
केंद्र सरकारद्वारे चालवलेली रुग्णालये, राज्य सरकारद्वारे चालवलेली रुग्णालये आणि दिल्लीतील खासगी रुग्णालयांनी दिलेल्या आकडेवारीचे डेथ ऑडिट कमेटीने योग्य विश्लेषण केल्यानंतरच ते प्रकाशित केले पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे, असे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती प्रितीक जालान यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.