पाटणा : निवडणुका तोंडावर आल्या की सर्व पक्ष आपापल्या आश्वासनांचे जाहीरनामे प्रसिद्ध करतात. रस्ते, पाणी, रोजगार, मंदिर अशा विविध गोष्टींबाबत आश्वासने देत, नेते जनतेकडे मतं मागतात. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी चक्क बिहारमधील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यावेळी त्या म्हणाल्या, की एनडीए सरकार यशस्वीपणे कोरोनाला लढा देत आहे. तसेच, कोरोनाच्या अनेक लसींच्या विविध स्तरांवर चाचण्या सुरू आहेत. आयसीएमआर ज्या कोरोना लसीला परवानगी देईल, ती लस बिहारच्या प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यात येईल.
बाकी देशाचं काय?
कोरोनाच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात तिचे उत्पादन घेण्यात येईल. बिहारच्या प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत मिळणार असे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय तर खरं. मात्र, देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत देणार का, याबाबत भाजपने काहीही माहिती दिली नाही.
खरंतर केंद्रात सत्ता आहे म्हटल्यावर देशातील प्रत्येक राज्य, आणि प्रत्येक नागरिक हा भाजपसाठी समान असायला हवा. अशा वेळी एकाच राज्यातील लोकांवर जास्त उदार होण्याचे कारण हे केवळ निवडणुकी पुरता आहे का असा संशय व्यक्त होत आहे. भाजपच्या या घोषणेमुळे विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे.