नवी दिल्ली - पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे नव्यानेच निवडून आलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. मयूर विहार या ठिकाणी आयोजित एका उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री केजरीवाल हे खोटे बोलून फक्त असत्याचे राजकारण करत असल्याचा आरोप गौतम गंभीरने केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या साडेचार वर्षाच्या कारकिर्दीत केवळ असत्याचे राजकारण केले आहे. केजरीवाल यांनी आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात सीसीटिव्ही लावण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्याच महिन्यात सीसीटिव्हीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, ते अजून पूर्ण झाले नसल्याचे गंभीर म्हणाला.
माझ्यासाठी महिलांची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सीसीटिही लावून महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काम करत असल्याचे गंभीरने सांगितले.
काही दिवसांपूर्वीच केजरीवाल सरकारने महिलांना मेट्रो, बस फ्री असल्याची घोषणा केली होती. या निर्णयावरूनही गंभीरने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. जर साडेचार वर्षात दिल्लीकरांसाठी काम केले असते तर, महिलांना मेट्रो, बसची सेवा मोहत करण्याची गरज पडली नसती, अशी टीका गंभीरने केली.