जयपूर - भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर नंतर भाजपच्या एका महिला आमदाराने हेमंत करकरेंवर प्रषोभक ट्विट केले आहे. भगवा दहशतवादासारखी कल्पना षडयंत्रपूर्वक रुजवण्यात हेमंत करकरेंचाही वाटा होता, असे त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर वीरमरण आलेल्या जवानांवरील सततच्या अशा वक्तव्यांमुळे राजकीय वतावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.
किरण माहेश्वरी, असे त्या महिला आमदाराचे नाव आहे. त्या राजस्थानच्या राजसमंदचे प्रतिनिधित्व करतात. तर, वसुंधरा राजे सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदही मिळाले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये भारताला बदनाम करण्यात हेमंत करकरेंचा हात होता, असे म्हटले आहे. तसेच षडयंत्रपूर्वक भगवा दहतवादासारखी संकल्पना त्यांनीच रुजवली, असेही त्यांनी त्या ट्विटमध्ये लिहिले आहे. त्यांनी हे ट्विट प्रसिद्ध लेखक आणि अर्थशास्त्रज्ञ अरुण शौरी यांना रिट्विट करताना केले आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजपच्या उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांचाही उल्लेख केला आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांना दहशतवादाच्या खोट्या गुन्ह्याखाली फसवण्यात आले. त्यांना अनंत अमानवीय यातना देण्यात आल्या. इमानदारीने आणि शौर्याने काम केले म्हणजे निरपराध नागरिकाला खोट्या प्रकरणात फसवण्याचा परवाना मिळत नाही, असा दावाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
भोपाळ मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हेमंत करकरेंवर असेच एक विधान केले होते. त्यामध्ये त्यांनी आपण श्राप देऊन करकरेंना मारले, असा दावा त्यांनी केला होता. ज्यानंतर त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली होती. आता किरण माहेश्वरी यांनी करकरेंवर लिहिल्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.