पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. भाजपने पाच सूत्र, एक लक्ष्य आणि ११ घोषणांसह आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात असे म्हटले आहे, की राज्यात एनडीएचे सरकार आले तर प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस देण्यात येईल. तसेच, एक कोटी महिलांना आत्मनिर्भर बनवण्यात येईल आणि १९ लाख नवे रोजगार देण्यात येतील. पाहूया यातील ठळक मुद्दे..
सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस..
एनडीए सरकार यशस्वीपणे कोरोनाला लढा देत आहे. तसेच, कोरोनाच्या अनेक लसींच्या विविध स्तरांवर चाचण्या सुरू आहेत. आयसीएमआर ज्या कोरोना लसीला परवानगी देईल, ती लस बिहारच्या प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यात येईल, असे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्याची सुरूवातच या आश्वासनाने केली आहे.
बिहारचा जीडीपी, आणि पक्की घरे..
एनडीए सरकारच्या काळात बिहारचा जीडीपी ३ टक्क्यांवरुन ११.३ टक्क्यांवर गेला आहे. त्यापूर्वीच्या १५ वर्षांच्या 'जंगल राज'मध्ये हे शक्य झाले नव्हते, असे सीतारमन यावेळी म्हणाल्या. तसेच, लालू यादव यांच्या कार्यकाळात राज्यातील केवळ ३४ टक्के लोकांना पक्की घरे मिळाली होती. तर, एनडीएच्या काळात ९६ टक्के लोकांना पक्की घरे मिळाल्याचा दावा सीतारमन यांनी केला.
उद्यापासून मोदी प्रचाराच्या मैदानात..
भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तर, उद्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. भाजपचा यावेळीचा जाहीरनामा हा मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' या घोषणेवर आधारित आहे.
बिहारमध्ये २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. तर, १० नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.
हेही वाचा : VIDEO : मुख्यमंत्री झालो तर दहा लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार - तेजस्विनी यादव