भोपाळ - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यानंतर मध्य प्रदेश भाजपचे संपर्क विभाग प्रमुख अनिल सौमित्र यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारतात त्यांच्यासारखे कोट्यवधी पुत्र आहेत. त्यात काही लायक तर काही नालायक असल्याचे अनिल सौमित्र यांनी म्हटले आहे.
अनिल सौमित्र म्हणाले, इंग्रजांनी पाकिस्तानच्या निर्माणाचे षडयंत्र रचले होते. हे षडयंत्र पुढे घेऊन जाण्यासाठी नेहरू आणि जिना यांची मुख्य भूमिका होती. या दोघांचे स्वप्न पूर्ण झाले कारण दोघांनाही पंतप्रधान बनायचे होते. या पूर्ण प्रक्रियेत त्यांना गांधीजींचा आशीर्वाद मिळाला.
इंग्रजांच्या षडयंत्रांना पूर्ण करण्यासाठी काँग्रेसने महात्मा गांधी यांना राष्ट्रपिताचा दर्जा दिला. मात्र, देशाला स्वतंत्र करण्यासाठी इतर महापुरुषांचे योगदान आहे. काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी हे केले. काँग्रेस गांधीजींच्या नावाने मते मागत असल्याचा आरोपही अनिल सौमित्र यांनी केला.
अनिल सौमित्र म्हणाले गांधीजी राष्ट्रपिता नाही, तर राष्ट्रपुत्र होते. पाकिस्तानचे निर्माण होत असताना गांधीजींनी नेहरू आणि जिना या दोघांनाही आशीर्वाद दिला. जर महात्मा गांधी हे फादर ऑफ नेशन होऊ शकतात तर पाकिस्तानचे होतील, भारताचे तर ते पुत्रच असतील.