भोपाळ - इंदूर लोकसभा मतदारसंघाचा पत्ता शेवटी भाजपने खोलला आहे. मात्र, या जागेवरून सुमित्रा महाजन यांच्याऐवजी शंकर लालवानी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे, तर दिल्लीतील ३ जागांवरही भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये दिल्ली भाजपाध्यक्ष मनोज तिवारी यांना उत्तर दिल्लीमधून रिंगणात उतरवले आहे.
मागील अनेक दिवसांपासून इंदूर लोकसभा मतदारसंघाचा पेच फसला होता. या मतदारसंघातून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी अनेकवेळा निवडणूक जिंकली आहे. यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळेल, असा अंदाज लावण्यात येत होता. मात्र, येथून आता शंकर लालवानी यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. त्यामुळे येथील संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.
इंदूर मतदारसंघातून उमेदवार घोषित न केल्यामुळे मध्यंतरी सुमित्रा महाजन यांनी पक्षाध्यक्ष अमित शाहंना पत्र लिहिले होते. त्यावरुन लवकरात लवकर या जागेवर उमेदवार घोषित करावा अशी मागणीही केली होती. त्यांची ही हाक पक्षाने खूप वेळानंतर ऐकलेली दिसते.
याव्यतिरिक्त दिल्लीच्या चांदणी चौक येथून केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्तर दिल्लीतून मनोज तिवारी आणि पश्चिम दिल्लीतून प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील घोसी या जागेवर हरिनारायण राजभर आणि अमृतसर येथून हरदीप पुरी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.