नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर, हे माहित असणे गरजेचे आहे, की दिल्लीतील पक्ष आपल्या जाहीरनाम्याशिवाय आणखी कोणते मुद्दे घेऊन जनतेपुढे जात आहेत. 'ईटीव्ही भारत'ने विविध पक्षांच्या नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे. यात आज आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा. पाहूया त्यांची ही विशेष मुलाखत..
प्रश्न - २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या भवितव्याबाबत तुमचे मूल्यांकन काय आहे? २०१५ च्या निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती.
चोप्राः ही निवडणूक काँग्रेस पक्षासाठी यशस्वी पुनरागमनाची ठरणार आहे.
प्रश्न - तुमच्या दाव्याला आधार काय आहे?
चोप्राः आपण जरा २०१३ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात जाऊ या. ती निवडणूक सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळ आणि हे अरिष्ट दूर करण्यासाठी जनलोकपाल विधेयक आणण्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झाली होती. जनलोकपाल असावा, असे प्रत्येकाला वाटत होते. गेल्या साडेसहा वर्षांत काय घडले? या मुद्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काय केले? त्यांनी काहीच केले नाही. त्याऐवजी, ही सर्व वर्षे केंद्र सरकार आणि दिल्लीचे नायब राज्यपाल आपल्याला काम करू देत नाहीत, असे आरोप ते करत राहिले आहेत.
प्रश्न - मग यावेळी तुमचा मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे, केंद्रात राजवट असलेला भाजप की दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार?
चोप्राः आमच्यासाठी दोघे हातात हात घालून आहेत. अलीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे खरे भाऊ असल्यासारखे वागण्यास सुरुवात केली आहे.
प्रश्न - तुमच्या आरोपाचे समर्थन कशा प्रकारे करता?
चोप्राः पहा, हरियाणात गेल्या वर्षी भाजप-जननायक जनता पार्टीचे सरकार स्थापन करण्यात केजरीवाल हीच व्यक्ती जबाबदार आहे.कारण त्यापूर्वी जेजेपीचे प्रमुख दुष्यंत चौताला हे केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या गटात होते. दिल्ली सरकारने दुष्यंत यांच्या वडलांना म्हणजे अजय चौताला यांना तिहार तुरूंगातून मध्यरात्री कोणत्याही नियमांचे पालन न करता सोडले. तुरूंगाच्या नियमावलीत असे स्पष्ट नमूद केले आहे की, राज्याच्या गृह खात्याकडून गेली पाहिजे. या प्रकरणात, दिल्लीचे गृहमंत्री आपल्याला याची कल्पना नाही, असे म्हणाले. मला वाटते की त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.
प्रश्न - दिल्लीच्या तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या स्वर्गीय शीला दिक्षित यांच्या कारकीर्दीवरच काँग्रेसच्या प्रचाराचा भर राहिला आहे. तुम्ही तीन कारणे सांगू शकता की ज्यामुळे लोकांनी तुमच्या पक्षाला मते द्यावीत?
चोप्राः विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ते निदर्शने करत होते आणि पोलिसांनी त्यांना क्रूरपणे मारले. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिस परवानगीशिवाय घुसले आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मात्र ते काही जणांनी कँपसमध्ये धुडगूस घातला असतानाही प्रवेशद्वाराजवळच प्रतीक्षा करत थांबले. पोलिसांनी दोन्ही प्रकरणात वेगवेगळी भूमिका घेतली. मुख्यमंत्र्याची निवड ही लोकांच्या संरक्षणासाठी केली जात असते. तेव्हा मुख्यमंत्री काय करत होते? जे सरकार असहाय्य विद्यार्थ्यांना वाचवू शकत नाही, त्याला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी (केजरीवाल) तेथे उपस्थित राहून त्यांचे (विद्यार्थ्यांचे) हित पहायला हवे होते. आणखी पुढे, दिल्लीतील प्रदूषण कमी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याचे काय झाले? गेल्या वर्षी श्वसनाच्या विकाराने दररोज ५८ लोकांचा मृत्यु झाला. कांद्याच्या वाढलेल्या किमतींकडे पहा. हे मुद्दे महत्वाचे आहेत. जे सरकार लोकांना स्वच्छ पाणी आणि हवा देऊ शकत नाही तसेच खाद्यपदार्थांच्या वाढणाऱ्या किमतींवर आळा घालू शकत नाही, त्याला सत्तेत राहण्याचा मुळीच अधिकार नाही. म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आम्ही आमचा दृष्टीकोन मांडत आहोत आणि केवळ त्यांनी काहीच केले नाही, असे सांगत नाही.
प्रश्न - पण आपने रहिवाशांना स्वस्त वीज देण्याचा दावा केला आहे. तुमची प्रतिक्रिया.
चोप्राः स्वस्त वीज पुरवल्याचा दावा खोटा आहे. मुख्यमंत्र्यांनी २०० युनिट्स विनामूल्य देण्याचे जाहीर केले होते. आम्ही ६०० युनिट्सपर्यंत दिलासा देण्याचे जाहीर केले आहे. परिवहन कंपन्यांच्याकडून सबसिडी देण्याचे त्यांनी वचन दिले आहे. राज्य त्यांनी खासगी कंपन्यांकडे का सोपवले? ग्राहकाच्या माध्यमातून ते फिरवता आले असते. आम्ही लहान दुकानदारांना २०० युनिट्सपर्यंत व्यापारी दर द्यावे लागणार नाहीत, असे आश्वासन दिले आहे.
नलिकाविहिरी चालवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहोत. दिल्लीत या गोष्टींची गरज आहे. आम्ही खोटी आश्वासने देत नाही. आम्ही जर म्हटले तर तसे करून दाखवतो. यापूर्वीही आम्ही तसे करून दाखवले आहे. एक काळ असा होता की दिल्लीत पाणी आणि वीज नव्हती आणि लोक राष्ट्रीय राजधानीत यायलाही घाबरत असत. दिल्लीत उड्डाणपूल आणि मेट्रो कुणी तयार केले, कुणी सीएनजी लागू केले, कुणी रूग्णालये, शाळा आणि ५ विद्यापीठे तयार केली? आम्ही दिल्लीला सर्वोत्कृष्ट राजधानी केली. ही सर्व काँग्रेस सरकारची निर्मिती आहे. जर लोकांनी आशिर्वाद दिला, तर आम्ही दिल्लीला पुन्हा सर्वोत्कृष्ट शहर बनवू.
प्रश्न - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काँग्रेस राष्ट्रव्यापी आंदोलन करत आहे. तुम्ही सीएए निदर्शनांमध्ये सहभागी न झाल्याचा दोष केजरीवाल यांना दिला आहे. दिल्ली निवडणुकीत हाही मुद्दा आहे का?
चोप्राः सीएए हा राष्ट्रीय मुद्दा आहे आणि अर्थातच, त्याचा दिल्लीवर परिणाम होणार आहेच. सीएए हा काही एका विशिष्ट जमातीसंदर्भात नाही तर सर्व नागरिकांच्या दृष्टीने काळजीचा आहे आणि प्रत्येक नागरिकाला त्या कायद्याविरोधात निदर्शने करण्याचा अधिकार आहे.पण त्यांना दिल्लीतील विद्यार्थ्यांप्रमाणे बेदम मारले जाऊ शकत नाही.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया यांनी नुकतेच सीएएविरोधात आंदोलन केले. पण त्यापूर्वी एक महिना विद्यार्थी जेव्हा रस्त्यावर होते आणि त्यांना मारहाण केली जात होती, तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यासाठी कोणतीही सहानुभूती दाखवली नव्हती. त्या तुलनेत, आम्ही आंदोलनकारी विद्यार्थ्यांसमवेत रात्र घालवली. हे विद्यार्थी केजरीवाल यांना धडा शिकवतील.
प्रश्न - केंद्र सरकारने सीएए आणला, असे तुम्हाला का वाटते?
चोप्राः भाजपची सत्ता असलेल्या केंद्राने सीएए कायदा हा आर्थिक आघाडीवर सरकारचे अपयश आणि नोकऱ्या निर्माण करण्यातील असमर्थता या मुद्यांवरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी आणला आहे. सीएएला आम्ही संसदेत आणि बाहेरही विरोध केला. पण आम्ही नेहमीच शांततापूर्ण निदर्शनांना पाठिंबा दिला आहे. कोणत्याही चळवळीत हिंसाचाराला स्थान नाही. अन्यथा, तिचा आपोआपच पराभव होतो. शाहीन बागमध्ये बसलेल्या महिलांचा मला अभिमान आहे. त्यांच्या मुलांच्या समर्थनासाठी त्या पुढे आल्या आहेत.
- अमित अग्निहोत्री
हेही वाचा : शाहीन बागेत गोळीबार करणार तरुण 'आप'चा कार्यकर्ता, दिल्ली पोलिसांचा दावा