बिष्णूपूर (पश्चिम बंगाल) - एकेकाळी बिष्णूपूरचे कंदील आणि दशावतार कार्ड्सना खूप मागणी होती. परंतु, या व्यवसायाशी संबंधित बरेच लोक या कामाऐवजी आता दुसरा व्यवसाय शोधत आहेत. या लोप पावत चाललेल्या कलेला वाचवण्याकरिता अलिकडेच बिष्णूपूर उपविभागीय प्रशासनाने आवश्यक ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
दशावतार कार्ड्सना पहिल्यांदा बंगालमध्ये राजा बिरहंबीच्या कारकिर्दीत तयार करण्यात आले होते. राजा बिरहंबी एकदा मुघल सम्राट अकबरच्या भेटीस गेले होते, तेव्हा पहिल्यांदा त्यांनी काही कार्ड्स तिथे पाहिले. दिल्लीवरून परतल्यानंतर राजा बिरहंबीनंही विष्णूच्या दशावतारातील कार्ड बनवण्याचे आदेश दिले. या शाही घराण्याशी एकनिष्ठ असलेले कुटुंब आजही दशावतार कार्ड बनवत आहेत. एकेकाळी बिष्णूपूरचे कंदिल संपूर्ण देशात प्रसिद्ध होते. परंतु, जसजशी इलेक्ट्रिक लाइट्सची संख्या वाढत गेली तसतशी कंदिलची मागणी घटू लागली आणि कारागिरांचा व्यवसाय ठप्प झाला. म्हणूनच आज कंदिलचे आधुनिकरण करत त्यावर दशावतार कार्ड्स रंगवले जाऊन या कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एकीकडे कंदिलचे विद्युत दिव्यांसह आधुनिकीकरण सुरू आहे. तर, दुसरीकडे या कंदिलांवर दशावतार कार्डच्या माध्यमातून विष्णूच्या दशावतार रुपातील संस्कृतीचंही चित्रणही केलं जात आहे. यामुळे कलाकारांच्या हाताला काम मिळण्यासह कलेचं पुनरुज्जीवन होण्यासही मदत होत आहे. सोबतच कलाकारांना हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठीचा उत्साह आणि प्रेरणाही मिळू लागली आहे.