पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. हिंदुस्थान अवाम मोर्चाचे (एचएएम) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी हे भाजप प्रणित एनडीएमध्ये सहभागी झाले आहेत.
मांझीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) महागठबंधनमधून २० ऑगस्टला बाहेर पडला आहे. ते संयुक्त जनता दलात त्यांचा पक्ष विलीन करणार असल्याची चर्चा होती. मांझी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची गुरुवारी भेट घेतली आहे. मांझी हे पूर्वी एनडीएमध्ये होते. त्यांनी युती तोडून २०१८ मध्ये महागठबंधनशी हातमिळवणी केली होती. सूत्राच्या माहितीनुसार मांझी यांनी तिसरी आघाडी करण्याचे प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी जन अधिकार पक्षाचे (जेएपी) पप्पू यादव आणि विकाशशील इन्सान पक्षाचे (व्हीआयपी) मुकेश साहनी यांची भेट घेतली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तिसरी आघाडी अस्तित्वात येणे कठीण आहे.
हेही वाचा-बिहार विधानसभा निवडणूका पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
दुसरीकडे भाजपमधील वरिष्ठ नेते आणि संयुक्त जनता दलाचा मागासवर्गीय मतांवर डोळा आहे. त्यासाठी मांझी हे चांगला पर्याय असल्याचे मानण्यात येत असल्याचे सूत्राने सांगितले. बिहारमध्ये एकूण ७ कोटी २१ लाख ४० हजार ९४५ मतदार आहेत. त्यापैकी १५ टक्के मते ही मागासवर्गीय समाजाचे आहेत. तर एकूण मतदारात १७ टक्के मुस्लीम, ५० टक्के ओबीसी, १९ टक्के हे खुला गट व २ टक्के आदिवासी मतदार आहेत.
हेही वाचा-बिहार विधानसभा निवडणूक : भाजप, संयुक्त जनता दल अन् लोक जनशक्ती पक्ष एकत्र लढणार
मांझी यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री राम विलास पासवान आणि इतर नेतेही मागासवर्गीयांचे प्रतिनिधीत्व करतात. दरम्यान, बिहारमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका पार पडणार असल्याची शक्यता आहे.