पाटणा - केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे काल (गुरुवार) निधन झाले. बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर असताना देशातील मोठ्या दलित नेत्याच्या मृत्यूचा मतदारांवर नक्कीच प्रभाव पडणार असल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये १६ टक्के दलित मते आहेत. पासवान यांच्या मृत्यूनंतर लोक जनशक्ती पक्षाला भावनिक लाटेवर स्वार होऊन मते मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
पासवान यांच्या मृत्यूनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, रामविलास पासवान अंथरुणाला खिळून असताना नितीश कुमारांनी त्यांच्यावर जाणतेपणी तर कधी अजाणतेपणी टीका केली होती. आता त्यांच्या मृत्यूनंतर जेडीयूच्या मतांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांनी आता एलजेपी पक्षापासून सावध व्हायला पाहिजे. कारण, याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत, जेव्हा एखाद्या बड्या नेताचा मृत्यू झाला, तेव्हा भावनिक मतांचा फायदा त्या पक्षाला झाला. पासवान हे बिहारमधील मोठे दलित नेते होते. त्यांनी जगाचा निरोप घेण्याआधी नितीश कुमारांना अडचणीत टाकले आहे.
पासवान यांच्या मृत्यूनंतर राजकीय पक्षांच्या रणनीतीतही बदल होईल. कारण, बिहारमधील जनता तर्कापेक्षा भावनिक मुद्द्याला जास्त महत्त्व देण्याची भीती राजकीय पक्षांमध्ये निर्माण झाली आहे. रामविलास पासवान कोणी सामान्य नेते नव्हते. समाजातल्या काही घटकावर त्यांचा प्रभाव होता. त्यामुळे जनता मतदानाद्वारे नक्कीच व्यक्त होईल.
प्रकृती खालावत असल्याची जाणीव रामविलास पासवान यांनाही होती. त्यामुळे त्यांनी पक्षाची धुरा मुलगा चिराग पासवान याच्याकडे दिली. आपण जास्त दिवस जगणार नाहीत, याची माहिती कदाचित पासवान यांना असावी, त्यामुळे त्यांनी मुलाच्या राजकीय प्रवासाला पाठिंबा दिला. आता निवडणुकीत एलजेपीवर हल्लाबोल करताना एनडीएलाही मवाळ भूमिका घ्यावी लागणार आहे.