पाटना - बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आपल्या मंत्रींडळाचा विस्तार केला आहे. यात केवळ नितिश यांच्या जदयू पक्षाच्याच ८ आमदारांना मंत्रीपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे केंद्रात आणि राज्यात युती असलेल्या भाजपला या मंत्रीमंडळ विस्तारात एकही जागा देण्यात आली नाही.
बिहारमध्ये जदयू आणि राजद युतीचे सरकार स्थापन झाले होते. त्यांच्यात समसमान मंत्रीपदे वाटण्यात आली होती. मात्र, अंतर्गत वादांमुळे नितिश यांनी भाजचा पाठिंबा घेऊन राजदच्या मंत्र्यांना सरकारमधून बाहेर काढले होते. राजदच्या मंत्र्यांची पदे रिकामी होती. त्या खात्यांचा अधिभार इतर मंत्र्यांकडे होता. मात्र, आता नितिश यांनी मंत्रींडळाचा विस्तार केला असून ८ नविन आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. अशोक चौधरी, श्याम रजक, बीमा भारती, नरेंद्र नारायण यादव यांच्यासह अन्य ३ जणांचा यात समावेश आहे. त्यांना बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली.
नितिश कुमार यांचे बिहारमधील सरकार भाजपच्या पाठिंब्याने सत्तेत आहे. यावेळी मंत्रीमंडळ विस्तारात भाजपला काही मंत्रीपदे मिळण्याची शक्यता होती. मात्र, नितिश यांनी भाजपला डावलले आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात जदयूला एकच मंत्रीपद देण्यात आले होते. नितिश कुमारांची त्यावर नाराजीही दिसून आली होती. त्यांनी मंत्रीपद नाकारून विनाअट पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, नितिश यांचा राग या मंत्रीमंडळ विस्तारात दिसून आला. भाजपला राज्यात एकही मंत्रीपद न देता त्यांनी हिशेब चुकता केला आहे.
नितिश यांच्या भूमिकेवर भाजप काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. नितिश यांचा पाठिंबा भाजपने काढून घेतल्यास नितिश यांचे सरकार कोसळू शकते. शिवाय नितिश यांचे लालूप्रसाद यादव यांच्या राजद पक्षासोबतही चांगलेच खटके उडाले आहेत. त्यांमुळे येत्या काळात बिहार राजकारणात मोठ्या राजकीय उलथापालथी घडून येण्याची शक्यता आहे.