पटना - बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील ७१ जागेसाठी आज मतदान होत आहे. यात दोन करोडहून अधिक नागरिक १ हजार ६६ उमेदवारांमधील आपला आमदार निवडतील. कोविड काळात पहिल्यांदाच मतदान होत असून यात किती मतदार आपला हक्क बजावणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अशी केली आहे निवडणूक आयोगाने तयारी -
कोविडच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाने सुरक्षित मतदानासाठी काही निर्देश जारी केले आहेत. या निर्देशानुसार, एका मतदान केंद्रात मतदारांची संख्या कमी करण्यात आली आहे. पूर्वी एका मतदान केंद्रावर १६०० मतदार असतील तर तिथे १ हजार मतदार मतदान करतील. तसेच ८० हून अधिक वय असलेल्या वयोवृद्ध मतदारांसाठी पोस्टल बॅलेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय इलेक्ट्रानिक वोटिंग मशिनला सॅनिटाइज करणे, मतदान अधिकाऱ्यांना मास्क, थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर, साबण, पाणी यासह आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत.
किती मतदार आपला हक्क बजावणार -
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात २.१४ करोड मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १.०१ करोड महिला तर ५९९ तृतीयपंथी आहेत. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये ९५२ पुरूष तर ११४ महिला आहे. गया सिटी मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार असून त्यांची संख्या २७ इतकी आहे. तर सर्वात कमी उमेदवार बांका जिल्ह्यातील कटोरिया विधानसभेच्या जागेवर आहेत. येथे ५ हून कमी उमेदवार रिंगणात आहेत.
कोणता पक्ष किती जागेवर लढवत आहे निवडणूक -
पहिल्या टप्प्यातील निवडणूकीत ७१ जागेसाठी मतदान होत आहे. यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष ३५ जागेवर निवडणूक लढवत आहे. तर नितीश यांचा सहकारी पक्ष भाजपाने २९ जागेवर आपले उमेदवार उतरवले आहेत. विरोधी पक्षाचे सांगायचे झाल्यास राजद ४२ तर काँग्रेस २० जागेवर लढत देत आहे. याशिवाय चिराग पासवान यांचा लोकशक्ती पक्षाने ४१ जागेवर आपले उमेदवार उतरवले आहेत.
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींनी केला प्रचार
राहुल गांधी यांनी २३ ऑक्टोबरला दोन प्रचारसभा घेतल्या. सीमेवर चीनशी असलेला तणाव आणि लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांचा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यात तीन प्रचार सभा घेतल्या. पंतप्रधान मोदींनी सासाराम, गया आणि भागलपूर येथे जाहीर सभांना संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी राजद आणि काँग्रेसला लक्ष करत आपण केल्या कामांचा दाखला दिला होता.