नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली तत्काळ तिकिट आरक्षणाची सुविधा सरू करण्यात आली आहे. रेल्वेकडून चालविण्यात येणाऱ्या सर्व 230 विशेष गाड्यांमध्ये ग्राहकांना आता तत्काळ तिकिट आरक्षित करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
देशामध्ये 25 मार्चपासून कोरोनाच्या फैलावामुळे सर्व मेल/ एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. फक्त 230 विशेष गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे. ‘29 जूनपासून तत्काळ तिकीट बुकिंगची सुविधा सुरू करण्यात येईल याची माहिती 30 मे ला सर्व ग्राहकांना देण्यात आली होती. मंगळवारी म्हणजे आज सुटणाऱ्या गाड्यांसाठी सोमवारी तत्काळ कोट्यातून बुकिंग करण्यात आल्याचे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले’.
तत्काळ कोट्यांतर्गत वातानुकूलित डब्यांसाठी सकाळी 10 नंतर बुकिंग सुरु झाले तर 11 नंतर स्लीपर क्लाससाठी बुकिंग सुरु झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. फक्त परवानगी देण्यात आलेल्या विशेष 230 गाड्या सुरु आहेत. त्यामुळे जोपर्यंत कोरोना प्रभाव कमी होत नाही, तोपर्यंत सेवा सुरु होण्याची शक्यता कमी आहे.