सिंधुदुर्ग - अतिवृष्टीमुळे कोकणातील समुद्र उधाणलेला आहे. समुद्राच्या या उधाणाचा सर्वाधिक फटका किनारपट्टी भागाला बसल्याचे पाहायला मिळत आहे. देवगड तालुक्यातील तांबळडेग स्मशानभूमी परिसराची लाटांच्या माऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
तांबळडेग स्मशानभूमी परिसरात समुद्राचे पात्र सुमारे अर्धा ते एक किलोमीटर विस्तारल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच समुद्राच्या लाटा देखील आतपर्यंत येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. किनारपट्टीची धूप झाल्याने किनाऱ्यालगतची स्मशानभूमी अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. किनारपट्टीची अशीच धूप होत राहिल्यास मनुष्यवस्तीत पाणी घुसण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा बांधवा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.