नवी दिल्ली - इस्रायलमध्ये १७ सप्टेंबरला निवडणुका होणार आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्यासोबतचे पोस्टर्स झळकावले आहेत.
तेल अवीव येथे असलेल्या लिकुड पक्षाचे मुख्यालय प्रचाराच्या पोस्टर्सनी झोकाळून गेला आहे. यामध्ये नेतान्याहू यांच्यासोबत जगातील बलाढ्य ३ नेत्यांची पोस्टर्स झळकावण्यात आली आहेत. या माध्यमातून नेतान्याहू जगातील नेत्यांसोबत आपली जवळीक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. याद्वारे इस्रायलमध्ये त्यांच्या तोडीचा दुसरा कोणताही नेता नाही, अशी प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बेंजामिन नेतान्याहू इस्रायलमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी ९ सप्टेंबरला भारत दौरा करणार आहेत. दौऱ्यात नेतान्याहू मोदींसोबत चर्चा करणार आहेत. काही राजकीय जाणकारांनुसार, मोदींसोबतच्या छायाचित्राद्वारे नेतान्याहू जगभरातील नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध दाखवून मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न करू शकतात. यासोबतच निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी प्रचाराला गती देण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो.