बंगळुरू - पैशांसाठी एका महिलेने पतीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकात घडला आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. घर घेण्यासाठी पतीने ४० लाख जमविले होते. मात्र, त्यावर पत्नीचा डोळा होता. हे पैसे मिळविण्यासाठी तिने कोरोनाच्या नावाखाली चार नातेवाईकांना बरोबर घेत अपहरणाचा भन्नाट प्लॅन बनवला.
कसा आखला अपहरणाचा कट
पीडित व्यक्तीचे नाव सोमशेखर असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. थयागराजगनर भागात तो राहण्यास आहे. त्याची पत्नी सुप्रियाने किरण नामक डॉक्टरच्या मदतीने कोरोना झाल्याचा बनावट अहवाल तयार केला. तसेच अपहरण करण्यासाठी चार नातेवाईकांची मतद घेतली. यात तिच्या आईचाही समावेश होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमशेखरला काही अज्ञान व्यक्तींनी आरोग्य कर्मचारी असल्याचे भासवत रुग्णवाहिकेतून घेवून गेले. तुला कोरोना झाला असून तू रुग्णालयातून पळून का आलास? असे म्हणत आरोपींनी सोमशेखरला गाडीत बसवले. तेथून त्याला एका फार्महाऊसवर घेवून गेले. याठिकाणी त्याला मारहाण करण्यात आली. तसेच ४० लाख रुपयांची मागणी केली.
घाबरलेल्या सोमशेखरने त्याच्या मित्राला फोन केला. पत्नीकडे दहा लाख रुपये दे, असे त्याने मित्राला सांगितले. त्यानंतर त्याचा मित्र घरी गेला असता सुप्रिया घरी नव्हती. त्याने फोन केला असता मला कोरोनाची लागण झाली असून मगादी रोड येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याचे तिने खोटे सांगितले. मात्र, मित्राला शंका आल्याने त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
बेपत्ता सोमशेखरचा पोलिसांनी शोध सुरू केला. तसेच त्याच्या पत्नीचीही चौकशी केली. मात्र, मला कोरोनाची लागण झाली असून माझ्यावर उपचार सुरू असल्याचे ती पोलिसांना सांगत राहिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने पतीचे अपहण केल्याची कबूली दिली. या प्रकरणी पोलीस अद्याप तपास करत आहेत.