बंगळुरू - सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे ११ ऑगस्टला बंगळुरू शहरात दंगल उसळली होती. या वेळी दोन पोलीस ठाणे आणि आमदाराचे घरही पेटवून देण्यात आले होते. या प्रकरणातील दंगलखोरांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दोषींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, हा आमचा मुख्य हेतू आहे, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त कुलदीप जैन म्हणाले. दंगल घडवून आणणाऱ्यांना तुरुंगातून बाहेर न सोडण्यासाठी आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. जर त्यांना बाहेर सोडले तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल. कोणताही गुन्हा करुन सहज तुरुंगातून बाहेर येता येते, असा संदेश लोकांमध्ये जाईल, असे जैन म्हणाले.
११ ऑगस्ट रोजी झालेल्या दंगलीनंतर सुमारे ४०० जणांना अटक करण्यात आली आहे. आम्हाला दंगलीप्रकरणी आणखी माहिती मिळत असून त्यानुसार कारवाई करण्यात येत असल्याच जैन म्हणाले. दरम्यान, दंगल प्रकरणातील एक आरोपी मुद्दसर अहमद याला हैदराबादमधून नाही तर बंगळुरु शहरातून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
काँग्रेस आमदाराच्या पुतण्याने फेसबुकवरून द्वेष पसरवणारी पोस्ट शेअर केल्यानंतर ही दंगल पेटली होती. जमावाच्या हल्ल्यात दोन पोलीस ठाण्यांचे आणि काँग्रेस आमदाराच्या घराचे नुकसान झाले. तसेच अनेक गाड्याही पेटवून देण्यात आल्या. आज(शुक्रवार) काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचा पुतण्या पी. नवीन याने द्वेष पसरवणारी पोस्ट टाकल्याचे कबूल केले आहे.