बंगळुरु - बंगळुरु उच्च न्यायालयाने गुरुवारी अमुल्या लियोनाला जामीन दिला आहे. 20 फेब्रुवरीला सीएए, एनआरसीविरोधी आयोजित करण्यात आलेल्या सभेत पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिल्याने तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीआरपीसीच्या कलम 167 (2) नुसार अमुल्याला जामीन मंजूर झाला आहे. या कलमांतर्गत पोलिसांनी आरोपींविरोधात 90 दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करायचे असते. मात्र, पोलिसांनी अद्याप तसे केले नाही, त्यामुळे तीला जामीन मंजूर झाल्याचे अमूल्याचे वकील प्रसन्ना यांनी सांगितले.
दरम्यान बुधवारी अमुल्याचा जामीन सत्र न्यायाधीश विद्याधर शिराहट्टी यांनी नाकारला होता. तपास पूर्ण झाला नसून जामीन दिल्यास ती पळून जाण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटलं होते.
काय आहे प्रकरण?
'संविधान वाचवा' हा कार्यक्रम 20 फेब्रुवरीला कर्नाटकातील बंगळुरु येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अमुल्या नावाची मुलगी व्यासपीठावर बोलण्यासाठी आली. व्यासपीठावर आल्यानंतर, संयोजकांनी या तरूणीला बोलण्याची संधी देत तिच्याकडे माईक सूपूर्द केला. यावेळी तिने समोरील लोकांना आपल्यासोबत 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देण्यास सांगितले. त्यामुळे असदुद्दीन औवैसी हे देखील उपस्थित होते. त्यांनी या तरुणीला घोषणा देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तिच्या हातून माईक हिसकाऊन घेण्याचा प्रयत्न केला.