बालोतरा (बाडमेर) - जिल्ह्यातील जसोल गावात रविवारी मंदिराच्या आवारातील मंडप कोसळल्याने मोठा अपघात झाला. राम कथा सुरू असताना जोरदार वारा आणि पावसामुळे हा मंडप कोसळला. घटनेवेळी पाऊस सुरू असल्याने विजेचा प्रवाह मंडपात पसरल्याने १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास ५० लोक जखमी झाले असून ४ गंभीर आहेत.
यापैकी २० जखमींना बालोतरा येथील नाहटा रुग्णालयात भरती करण्यात आले. तर, इतर जखमींना प्रथोमपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. सरकारने घटनेचा तापस करण्यासाठी विभागीय आयुक्तांना आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये तर, जखमींना प्रत्येकी २ लाख रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
बाडमेर दुर्घटनेचा Live व्हिडियो : कथावाचकाने दिला इशारा... पळा, पळा... मंडप उडतोय
घटनेची माहिती मिळताच, बाडमेरचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जोधपूर विभागाचे पोलीस निरीक्षकांसह इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. जखमींवर योग्य उपचार करण्यासाठी बाडमेर मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरांच्या पथकाला बालोतरा रुग्णालयात पाचारण करण्यात आले आहे. जसोल मंदिर ट्रस्टकडून घटनेबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आले. उशिरा रात्री ९ मृतदेहांना त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. तर, सकाळी ५ मृतदेह सोपवण्यात येणार आहे.
वादळी वाऱ्यासोबत पाऊस असल्याने जास्त नुकसान
प्रत्यक्षदर्शीयांच्या माहितीनुसार, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंडपाचे खांब उपसले गेले. त्यामुळे विजेची तार तुटून मंडपावर कोसळली. मंडळाकडून विज बंद केल्यानंतरही तेथील ऑटो जनरेटर चालूच होता. त्यात पावसाच्या पाण्यामुळे विजेचा प्रवाह मंडपात पसरल्याने जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली.