पणजी- गोवा सरकारच्या मत्स्य विभागाने संपूर्ण राज्यात मासेविक्री करण्यास परवानगी दिली आहे. मासेविक्री करताना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळण्याबाबत मत्स्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मासे गोव्यातील नागरिकांच्या आहारातील महत्वाचा घटक आहे. लॉकडाऊनमुळे एक महिनाभर मासेविक्री बंद करण्यात आली होती.
मासेविक्रीवर बंदी घालण्यापूर्वी पकडण्यात आलेले मासे मोठ्या प्रमाणावर राज्यामधील शीतगृहामध्ये पडून आहेत, अशी माहिती गोव्याचे मत्सोद्योग मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी सांगितले. राज्यातील लोकांना मासे खायला आवडते, ते गेल्या महिनाभरापासून मासे खाऊ शकले नाहीत. राज्यातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्था आणि संघटनांना मासेविक्री करण्यास परवानगी देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पारंपारिक मासे विक्री होत असलेल्या बाजारपेठांना मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी परवानगी दिलेली नाही. लोकांना बाजारात न जाता मासे कसे उपलब्ध करुन देता येतील याचा विचार करत आहे, असे फिलीप नेरी रॉड्रिग्ज म्हणाले. जवळपास 500 टन मासे शीतगृहामध्ये पडून आहेत ते खराब होण्यापूर्वी त्याची विक्री होणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.
ऑल गोवा होलसेल फिश मार्केटस असोसिएशनचे अध्यक्ष इब्राहिम मौलाना यांनी गोवा सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मासे शीतगृहांमध्ये आहेत ही मोठी समस्या आहे, असेही त्यांनी सांगितले. गोव्यातून 80 टक्के मासे निर्यात केले जातात तर फक्त 20 टक्के मासे राज्यातील नागरिकांकडून खाल्ले जातात. आम्ही मासे विक्री करायला तयार आहोत. मात्र, ग्राहक मासे खरेदी करण्यासाठी येतील का याबाबत त्यानी शंका व्यक्त केली. लोकांची गर्दी टाळण्यासाठी खुल्या बाजारात विक्री करण्याऐवजी एक किलोची पॅक तयार करावेत, असेही त्यांनी सुचवले आहे.