चंदीगड - शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित बलविंदर सिंह यांची पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. घराशेजारील कार्यालयात असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
बलविंदर सिंह (६२) हे पंजाबातील खलिस्तानी चळवळ आणि दहशतवाद्यांशी मागील अनेक वर्षांपासून लढत होते. अनेक वेळा त्यांच्यावर आणि कुटुंबीयांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मात्र, ते या हल्ल्यातून बचावले होते. मात्र, मागील वर्षी तरणतारण पोलिसांच्या शिफारसीनंतर सिंह यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यांचे संपूर्ण कुटुंब दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे.
खलिस्तानी चळवळ आणि पंजाबातील दहशतवादी कारवाया नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी आपल्या भिखीविंड गावाचे रुपांतर किल्ल्यात केले होते. कुटुंबीयांसह मिळून त्यांनी आर्मी स्थापन केली होती. त्यांनी स्वत: आणि कुटुंबीयांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले होते. ८० आणि ९०च्या दशकात त्यांनी केलेल्या कामामुळे १९९३ साली संरक्षण मंत्रालयाने त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केले होते. एकदा सुमारे दोनशे दहशतवाद्यांनी त्यांच्या गावाला घेरले असता त्यांनी धाडसाने दहशतवाद्यांचा सामना केला होता. तरुणांना कट्टरतावादापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी काम केले होते.