समस्तीपूर - एकीकडे सरकार गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मोठ-मोठ्या गप्पा मारत आहे. मात्र, दुसरीकडे अनेक गावांमध्ये शिक्षणासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बिहारमधील अनेक शाळांमध्ये मुलभूत विकासापासून वंचित आहेत. समस्तीपूर जिल्ह्यातील छतौनी मधील एका शाळेची दुरवस्था समोर आली आहे.
राजकीय मध्य विद्यालयातील विद्यार्थी सध्या अत्यंत कठीण स्थितीत शिक्षण घेत आहेत. पडक्या आणि झोपडीसारखे छत असलेल्या इमारतीत जवळपास ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही इमारत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे कधीही दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शाळेत ना शौचालय आहे, ना पाणी. तसेच मध्यान्न जेवनाची सुवुधाही व्यवस्थीत नसल्याचे समोर आले आहे.
शाळेच्या परिसरात सापांचा वावर
या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही जमिनीवर खाली बसून शिक्षण घेत आहोत. शाळेच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. शाळेच्या परिसरात सापांचा आणि विषारी किटकांचा वावर असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. शाळेत पिण्याच्या पाण्याची सविधा नसल्याने पाणी पिण्यासाठी दुरवर जावे लागते.
बिहारमध्ये अशा प्रकारे अनेक शाळांची दुरावस्था झाली आहे. याकडे ना शाळेच्या प्रशासनाचे लक्ष आहे, ना सरकारचे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गप्पा करणाऱ्या सरकारचे दावे खोटे ठरले आहेत.