नवी दिल्ली - सोशल मीडियामुळे लोकप्रिय झालेल्या दक्षिण दिल्लीमधील 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांनी यूट्युबर गौरव वासनविरोधात तक्रार दाखल केली आहे. कांता प्रसाद यांनी गौरव वासनवर पैशाची हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे.
वासनने व्हिडीओ शूट करत, मला लोकांना आर्थिक मदत मागण्यास सांगितले. मात्र, तेव्हा त्याने आपले कुटुंबीय आणि मित्रांचे मोबाइल नंबर दात्यांना दिले. देणगीदारांनी दिलेली मदत त्याने आपल्यापर्यंत पोहचू न देता, हडप केली, असा दावा कांता प्रसाद (८०) यांनी केला आहे.
'बाबा का ढाबा'बद्दल काही दिवसांपूर्वी कोणाला माहितीही नव्हती. लॉकडाऊनमुळे तिथे कोणी जात नव्हते, त्यामुळे हा ढाबा चालवत असलेले दाम्पत्य अडचणीत आले होते. मात्र, या ढाब्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता याठिकाणी लोकांच्या रांगा लागल्या. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्या आर्थिक अडचणीविषयी सांगितले होते. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ‘बाबा का ढाबा’ला बरीच प्रसिद्धी मिळाली होती.
गौरव वासनने आरोप फेटाळले -
गौरव वासनने पहिल्यांदा बाबा का ढाबाचा व्हिडीओ यूट्युबवर पोस्ट केला होता. गौरव वासनने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. तसेच आपण कोणतीच हेराफेरी केली नसून व्हिडीओच्या माध्यमातून एक बँक स्टेटमेंट जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे 'बाबा का ढाबा'..
कांता प्रसाद, त्यांची पत्नी बदामी देवी आणि त्यांची दोन मुले मालवीय नगरमध्ये राहतात. गेल्या तीस वर्षांपासून कांता प्रसाद हा ढाबा चालवत आहेत. रोज सकाळी सहाच्या सुमारास कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी ढाब्यावर पोहोचतात. ते आणि त्यांची पत्नी मिळून स्वयंपाक करत असल्यामुळे ढाब्यावरील अन्नालाही घरगुती चव असते. साधीच डाळ, भात, पोळी, भाजी अशा प्रकारचे पदार्थ याठिकाणी मिळतात.