मेलबर्न - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत ६ हजारापेक्षा जास्त नागरिकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर १ लाख ८० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक लस आणि औषध शोधण्यासाठी संशोधन करत आहेत.
ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी औषध मिळवल्याचा दावा केला आहे. एचआयव्ही आणि मलेरिया आजारावरील उपचासाठी असलेल्या औषधांचा वापर कोरोनाचा संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात येत आहे. क्विन्सलँड विद्यापीठातील क्लिनिकल रिसर्च विभागात हे प्रयोग सुरू आहेत. प्रयोगशाळेतील चाचण्यांमधून कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आल्याचे दिसून आले आहे. आता माणसांवर ओषधांचे प्रयोग करण्यात येणार आहेत, असे संशोधन विभागाचे प्रमुख डेव्हिड पॅटरसन यांनी सांगितले.
काही कोरोना बाधित रुग्णांना ही औषधे उपचार सुरु असताना देण्यात आली होती. या औषधांनी ते पूर्णपणे बरे झाल्याचा दावा पॅटरसन यांनी केला आहे.
अमेरिकेत कोरोना विषाणूवर प्राथमिक लस तयार करण्यात आली असून त्याच्या चाचण्या सोमवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत. एका व्यक्तीला लस टोचण्यात आली असून या चाचण्यांची माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नाही.