कुलू - हिमाचल प्रदेशातील उंच भागात मागील चार दिवसांपासून सतत बर्फवृष्टी सुरू आहे. लाहुल स्पिती आणि मनालीसहीत इतर भागात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे अटल बोगदा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. सोलंगनाला, कोठी आणि अंजनी महादेव भागात १० इंचापर्यंत बर्फाचा थर साचला आहे.
जास्कर खोऱ्याचा लाहुलपासून तुटला संपर्क
शिंकुला खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी झाल्याने लाहुल खोऱ्याचा संपर्क तुटला आहे. अटल बोगद्यापासून जवळच काही अंतरावर पोलिसांनी चौकी उभी केली असून पर्यटकांना पुढे जाण्यापासून रोखण्यात येत आहे. यासोबतच रोहतांग, कुंजम, बारालाच आणि शिंकुला खोऱ्यात अडीच फुटापर्यंत बर्फाचा थर साचला आहे. कुलू मनालीसहीत लाहुल स्पिती भागातील डोंगर बर्फाच्या चादरीखाली झाकून गेले आहेत.
डोंगराळ उंच भागात न जाण्याचे पर्यटकांना आवाहन
डोंगराळ भागात सतत बर्फवृष्टी होत असल्याने शेतकरी आणि व्यावसायिक आनंदी आहेत. मनाली येथील पर्यटन स्थळे बर्फाने झाकून गेली आहेत. येत्या काही दिवसांत त्यामुळे आणखी पर्यटक या भागांत आकर्षित होणार आहेत. धर्मशाळा, शिमला आणि डलहौसी या पर्यटन स्थळी पर्यटकांची संख्या वाढत आहे.