गुवाहाटी - नागरिकत्व (सुधारणा) कायद्याविरोधात ईशान्य भारतात जोरदार निदर्शने सुरू आहेत. आतापर्यंत या आंदोलनात तिघांना जीव गमवावा लागला आहे. तर, २७ जण जखमी झाले आहेत. गुवाहाटी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ही माहिती दिली आहे. येथे जखमींवर उपचार सुरू आहेत.
नागरिकत्व कायदा (सुधारणा) विधेयक २०१९ संसदेत मांडल्यापासूनच ईशान्येकडील राज्यांमध्ये आंदोलनाची ठिणगी पडली होती. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक मंजूर झाल्यानंतर १२ डिसेंबरला राष्ट्रपतींच्या सहीने याचे कायद्यात रूपांतर झाले होते.
नागरिकत्व (सुधारणा) कायद्यानुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातील हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारशी समाजातील ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेल्या निर्वासितांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात येणार आहे.