नवी दिल्ली - आसाममध्ये नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी उद्या जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, गृहमंत्रालयाने लोकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
यासोबतच, मंत्रालयाने हेही स्पष्ट केले आहे, की एनआरसी यादीमध्ये नाव नसल्यास, लगेच कोणाला परदेशी घोषित केले जाणार नाही. यादीमध्ये नाव नसल्यास, परदेशी न्यायाधिकरणामध्ये दाद मागता येईल. यासाठीच परदेशी न्यायाधिकरणांची संख्या देखील वाढवण्यात येते आहे.
दरम्यान, आसाम सरकारने एनआरसी यादी प्रसिद्ध होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. केंद्रीय गृहमंत्रालय हे राज्य सरकारशी कायम संपर्कात आहे. यादी जाहीर झाल्यानंतर, यादीमध्ये नसलेल्या लोकांच्या रोषामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, राज्य सरकार त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास कितपत समर्थ आहे याचा केंद्र सरकार आढावा घेत आहे.
एनआरसी यादी ही आसाममधील लोकांच्या भारतीय असण्याचे परिमाण आहे. आसाममध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या परदेशी लोकांची माहिती मिळवून, त्यांवर कारवाई करण्यासाठी ही यादी उपयोगी ठरणार आहे. विशेषतः बांगलादेशमधून आलेल्या निर्वासितांची ओळख पटावी हाही यामागची उद्देश आहे.
१९५१ नंतर प्रथमच, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत भारताच्या कुलसचिवांमार्फत ही यादी अद्ययावत करण्यात येत आहे.
हेही वाचा : पत्नीचे भारतीयत्व सिद्ध न होण्याच्या भीतीने पतीची आत्महत्या