गुवाहाटी - आसाममध्ये सध्या नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदणीची यादी (एनआरसी) करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात या यादीचा कच्चा आराखडा जाहीर झाला होता. या कच्च्या यादीमध्ये आपल्या पत्नीचे नाव नसल्याने, तिचे भारतीयत्व सिद्ध होणार नाही या तणावातून करीमगंज येथील एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे.
प्रीती भूषण दत्ता असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. करीमगंजमधील सोनारीपूर गावात तो राहत होता. गेल्या काही दिवसांपासून एनआरसी यादीच्या प्रकरणावरून तो तणावात होता. अंतिम यादीमध्ये देखील जर पत्नीचे नाव नसेल, तर काय होईल याची चिंता त्याला भेडसावत होती. याच तणावातून त्याने आत्महत्या केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर आता तपास सुरु आहे.
'एनआरसी'मुळे ३७ लाख लोक तणावात...
एनसीटीएने (अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय मोहीम) केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, एनआरसीच्या मुद्यावरून आसाममधील ८९ टक्के जनता, म्हणजेच जवळपास ३७ लाख लोक हे तणावाखाली आहेत. याबाबत एनसीटीएने 'आसाम एनआरसी : चाळीस लाख लोकांच्या मानसिक तणाव, आघात आणि अपमानाची कथा' या नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
सध्या आसाममध्ये 100 परदेशी न्यायाधिकरणे आहेत. ऑक्टोबरमध्ये आणखी २०० परदेशी न्यायाधिकरणे उभारण्यात येणार आहेत. एनआरसीची अंतिम यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे.