गुवाहाटी - आसाममध्ये पुरामुळे मृत्यू झालेल्या आकड्यात भर पडली आहे. बारपेटा जिल्ह्यात शनिवारी एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा ८१ वर पोहचला आहे.
आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील १७ जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे. पुरामुळे १ हजार ७१६ गावे आणि जवळपास २१ लाख ६८ लाख लोकसंख्या प्रभावित झाली आहे. नागरिकांना मदत मिळावी, यासाठी ६१५ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत.
नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली
राज्यातील काही नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. यामध्ये ब्रम्हपुत्रा नदीने निआमाटीघाट (जोरहाट) आणि ढुबरी येथे धोक्याची पातळी ओलांडली आहे. देसांग नदीने नानगामुराघाट (सिवासागर), जिया भरली नदीने एन. टी रोड क्रॉसिंग (सोनितपूर), बेकी नदीने रोड ब्रिज (बारपेटा) आणि कुशीआरा नदीने करीमगंज या भागात धोक्याची पातळी ओलांडली आहे.
१७ जिल्हे अजूनही पुराच्या तडाख्यात
सोनितपूर, धेमाजी, दार्रंग, बासका, बारपेटा, नलबारी, चिरांग, बोंगाईगाव, कोक्राझार, ढुबरी, गोलपारा, कामरूप, कामरूप(एम), मोरीगाव, नागाव, गोलाघाट, जोरहाट आणि कचर जिल्हे पुराने प्रभावित आहेत.