नवी दिल्ली - कोरोनाचं संकट असताना आसामवर आता पूराचं संकट आलं आहे. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महापुराचा 28 जिल्ह्यातील 33 लाख लोकांना फटका बसला आहे. तर मंगळवारी 9 जणांचा पुरामुळे मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या 85 वर गेली आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) दैनंदिन पूर-बुलेटिननुसार डिब्रूगड जिल्ह्यात तीन जणांचा, टीनसुकिया आणि बारपेटा येथे प्रत्येकी दोन, बिस्नाथ आणि गोलाघाट जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
होजई, धामाजी, लखीमपूर, बिस्नाथ, सोनीतपूर, उदलगुरी, दरंग, बकसा, नलबारी, बारपेटा, चिरंग, बोंगागांव, कोकराझार, धुबरी, दक्षिण साल्मारा, गोलपारा, कामरूप, कामरूप महानगर, मोरीगाव, नागगाव, पश्चिम कारबी आंगलोंग, गोलाघाट, जोरहाट, माजुली, शिवसागर, दिब्रूगड, तिनसुकिया आणि कारबी आंगलों, या भागांना महापूराचा फटका बसला आहे.
आसामच्या वेगवेगळ्या भागात संततधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ठिकठिकाणी पाणी भरले असल्याने वन्यजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आपला जीव वाचवण्यासाठी प्राणी सुरक्षीत जागा शोधत आहेत.
आतापर्यंत 102 प्राण्याची सुटका करण्यात आली आहे. तर काझीरंगा येथे पूरसंबंधित घटनांमध्ये 51 प्राण्याचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. पुरामुळे 1.28 लाख हेक्टरवरील पीक जमीन बुडली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी धामाजी पूर परिस्थितीचा आढावा घेतला.