हैदराबाद : हैदराबाद शहराच्या महानगरपालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा प्रचार सुरू आहे. भाजप आणि एमआयएम पक्षाच्या सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आज एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपावर आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. जुन्या हैदराबादवर नाही तर चीनच्या सैन्यावर 'सर्जिकल स्ट्राईक' करा, असा सल्ला ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींना दिला.
चीनने लडाख डेपसांग भागात भारताची भूमी बळकावली आहे. त्यावर बोलण्याची मोदींमध्ये हिंम्मत नाही. ते चीनचे नावही घेत नाहीत. सर्जिकल स्ट्राईक करायची असल्यास चीनवर करा, जुन्या हैदराबादवर नाही, असे ओवैसी म्हणाले. १ तारखेला मतदान होत असून पंतगाच्या चिन्हावर शिक्का मारण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. एमआयएम पक्ष भारतात आणखी मजबूत करण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
तेजस्वी सुर्या यांना ओवैसींचे उत्तर
"असदुद्दीन ओवैसी हे मोहम्मद अली जिना यांचे अवतार आहेत" असे म्हणत तेजस्वी सूर्या यांनी ओवैसींवर हल्लाबोल केला होता. ओवैसींना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्धं मत देणं असा घणाघात देखील केला होता. जुन्या हैदराबादमध्ये बांग्लादेशी घुसखोर आणि रोहिंग्या राहत असून महानगरपालिकेत सत्ता आल्यास जुन्या हैदराबादवर सर्जिकल स्ट्राईक करू, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.