हैदराबाद - कोणत्याही साथीच्या रोगाचे रुपांतर महामारीमध्ये करण्यात ठरावीक लोकांचे मोठे योगदान असते. काही ठराविक लोकांमुळे हे या रोगांचे विषाणू मोठ्या प्रमाणात पसरले जातात. अशा लोकांना 'सुपर स्प्रेडर्स' म्हटले जाते. साधारण व्यक्तीमुळे फारतर दोन किंवा तीन व्यक्तींना विषाणूचे संक्रमण होते. मात्र, सुपर स्प्रेडर्समुळे हजारो लोकांना विषाणूचे संक्रमण होते.
कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यामध्येही अशा काही सुपर स्प्रेडर्सचा हात राहिला आहे. पाहूयात अशा काही लोकांची माहिती..
दक्षिण कोरिया - दक्षिण कोरियामधील एका सुपर स्प्रेडरला 'सुपर ३१' असे नाव देण्यात आले आहे. ही व्यक्ती एका फ्रिंज चर्चची सदस्य होती. या व्यक्तीने दक्षिण कोरियामधील जवळपास १,१६० लोकांना संक्रमित केल्याची माहिती समोर आली आहे.
इटली - इटलीमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील १०० हून अधिक लोकांना संक्रमित केलेला एक सुपर स्प्रेडर अजूनही देशात खुलेआम फिरतो आहे. या व्यकीला प्रशासनाने 'संक्रमित रोगी शून्य' असे नाव दिले आहे.
इंग्लंड - स्टीव वॉल्श या व्यक्तीने एका देशातून दुसऱ्या देशामध्ये कोरोना विषाणू नेण्यात मोठी भूमीका बजावली. सिंगापूरमध्ये असताना कोरोनाची लागण झालेल्या स्टीवने इंग्लंडपर्यंतचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्याने जवळपास ११ लोकांना संक्रमित केले. त्यानंतर स्टीववरील उपचार यशस्वी झाले. मात्र या ११ लोकांमुळे पुढे कोरोनाचा विषाणू आणखी पसरला.
भारतातील सुपर स्प्रेडर्स...
काश्मीर - जम्मू काश्मीरमध्ये एका व्यावसायिकाने आधी हवाई जहाज, त्यानंतर रेल्वे आणि नंतर दिल्लीतील रस्त्यांवरूनही दिल्ली-उत्तर प्रदेश-जम्मू काश्मीर असा प्रवास केला. यानंतर त्याचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला काही दिवसांपासून कोरोनाची लागण झाली होती. त्याने हा जो प्रवास केला त्यादरम्यान तो कित्येक व्यक्तींच्या संपर्कात आला. या व्यक्तींपैकी एक असलेले जम्मू काश्मीरमधील एक डॉक्टर सध्या कोरोनाग्रस्त आहेत, आणि मृत्यूशी झुंजत आहेत.
महाराष्ट्र - मुंबईमध्ये एका ६५ वर्षाच्या महिलेने दुपारी हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिचे संपूर्ण कुटुंब आणि त्या हॉटेलमध्ये जेवण केलेल्या सर्व लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दिल्ली - दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरला सौदी अरेबियामधील एका व्यक्तीमार्फत कोरोनाची लागण झाली. त्यानंतर या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
राजस्थान - राजस्थानच्या भीलवाडामध्येदेखील एका डॉक्टरलादेखील सौदी अरेबियामधील व्यक्तीकडून कोरोनाची लागण झाली. त्यानंतर या डॉक्टरमुळे रुग्णालयातील १६ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबत डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या तब्बल आठ हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
निझामुद्दीन मरकज...
मार्चच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीमध्ये निझामुद्दीन मरकज हा तबलिगी जमातच्या सदस्यांचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. यामध्ये देश-विदेशांतील हजारो लोक सहभागी होते. यामध्ये बऱ्याच लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले लोक पुन्हा देशभरात पसरले, आणि त्यांच्यामार्फत हा विषाणूदेखील देशभरात पसरला आहे.
हेही वाचा : कोरोना इफेक्ट : लॉकडाऊनच्या काळात असुरक्षित अन् उपेक्षित ठरणारा गरीब वर्ग