अबक एटीएममधून तुम्ही 25,000 रुपये काढले आहेत. जर तुम्ही हा व्यवहार केला नसेल, तर ताबडतोब या क्रमांकावर कॉल करा! आम्ही तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करु. असे संदेश सायबर गुन्हेगारांच्या नव्या गैरव्यवहारांपैकी एक प्रकार आहे. त्यांचे सावज आहेत पुर्वाश्रमीच्या आंध्र बँकेचे ग्राहक. काही दिवसांपुर्वी आंध्र बँकेचे युनियन बँकेत विलीनीकरण झाले आहे. गुन्हेगार ग्राहकांना दिशाभुल करणारे संदेश पाठवत आहेत. या गैरव्यवहाराला बळी पडून काही पीडितांनी लाखो रुपये गमावले आहेत.
बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की त्यांना फसवण्यात आले आहे. आता ते सायबर गुन्हेगारी पोलिसांकडे वळत आहेत. ग्राहकांच्या माहितीचे हॅकिंग करुन हे गुन्हेगार निवृत्त अधिकारी आणि गृहिणींना अशा प्रकारचे संदेश पाठवतात. या निवडलेल्या गटाचा त्वरित प्रतिसाद लक्षात घेऊन ते हे करीत आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पैसे काढण्यासंदर्भातील अशा प्रकारचा संदेश वाचून पीडित व्यक्ती घाबरुन जातात आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तीस संपर्क करतात. या फसवणूक करणाऱ्या व्यक्ती फोनवर उत्कृष्ट हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात, ग्राहकांच्या नाव आणि पत्त्याचा अचूक तपशील पुरवतात.
हैदराबादमधील बंजारा हिल्स येथे राहणाऱ्या माजी बँक अधिकाऱ्याला अशाच प्रकारे फसवण्यात आले. या अधिकाऱ्याकडून युपीआय क्रमांकाची माहिती काढून घेत, या घोटाळेबाजांनी त्यांच्या खात्यातून 90,000 रुपये काढून घेतले.
सायबरगुन्हेगार हे ग्राहकांच्या नेट बँकिंग क्रेडेन्शिअल्ससह सर्व तपशील हॅक करत आहेत. ते दररोज 100 ते 200 ग्राहकांना संदेश पाठवतात. हे संदेश आंध्रा बँकेने पाठवलेले आहेत, असे वाटते. तो संदेश सहसा असा असतो, तुम्ही आंध्रा बँकेच्या एटीएममधून 25,000 रुपये काढले आहेत. जर तुम्ही हा व्यवहार केलेला नसेल, तर 9298112345 या क्रमांकावर संदेश पाठवा.
तुमचे कार्ड ब्लॉक करण्यासाठी त्वरित 18004251515 या क्रमांकावर कॉल करा. आंध्रा बँकेकडून. जेव्हा ग्राहक या क्रमांकावर कॉल करतात, हे घोटाळेबाज आपण बँक अधिकारी असल्याचे भासवतात आणि पीडीतांना असे आश्वासन देतात की, ही रक्कम त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. ते पीडितांच्या मोबाईल क्रमांकावर लिंक पाठवतात आणि त्यावर क्लिक करावयास सांगतात.
पीडित व्यक्ती कोणताही विचार न करता त्या लिंकवर क्लिक करतात. तेथे युपीआयशी जोडलेल्या बँक खात्याचा तपशील मागितला जातो. या युपीआय तपशीलाच्या सहाय्याने गुन्हेगारांकडून ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढले जातात. जेव्हा पीडितांना कळते की त्यांच्याबरोबर फसवणूक झाली आहे, हे सायबर गुन्हेगार कॉल कट करतात आणि त्यांचा फोन स्विच ऑफ करुन ठेवतात.