मुंबई - जम्मू काश्मीरला विषेश दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्यावरून अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. काश्मीरबाबतचे ३७० कलम अमानवीय पद्धतीने काढून टाकण्यात आले आहे. मागील २२ दिवसांपासून काश्मीरममध्ये राहत असलेल्या माझ्या सासू-सासऱ्यांशी कोणताही संवाद झालेला नाही, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - 'काश्मीर तुमचा कधी होता? ज्यासाठी तुमचे नेहमीच रडगाणे सुरू असते' राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
माझ्या सासू सासऱ्यांना आरोग्याच्या समस्या आहेत. मात्र, त्यांच्याकडे औषधे आहेत, की नाहीत हेही समजू शकले नाही. दोघांनाही मधूमेह आणि उच्चरक्तदाबाचा आजार आहे. त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याने त्यांच्या आरोग्याबाबत काहीही माहिती आम्हाला नाही. मी आणि माझे पती दोघेही त्यांच्याशी बोलू शकलो नाही. हे खूप अमानवीय आहे, असे मातोंडकर म्हणाल्या.
हेही वाचा - काश्मीरमध्ये महिलेने घरीच सुरु केले मोफत दूरध्वनी सेवा केंद्र
अभिनेत्री म्हणून कारकिर्द केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. मुंबईतून काँग्रेस पक्षाने त्यांना खासदारकीचे तिकीटही दिले होते. मात्र, भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी मोतोंडकर यांचा पराभव केला.
हेही वाचा - कलम ३७० रद्द केल्यानंतर लष्कर प्रमुख बिपीन रावत पहिल्यांदाच काश्मीरमध्ये जाणार
५ ऑगस्टला काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा केंद्र सरकारने काढून घेतला. तेव्हापासून राज्यातील संपर्क व्यवस्था ठप्प आहे. नुकतेच काही जिल्ह्यातील संपर्क व्यवस्था सुरू करण्यात आली. अनेक भागात मोबाईल, इंटरनेट आणि लँडलाईन सेवा बंद करण्यात आली आहे. सुरक्षेसंदर्भातील उपाययोजना राबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. मात्र, त्यामुळे काश्मीरचा इतर भारताशी संपर्क तुटला आहे. भारताच्या इतर भागांमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधता येत नाही.