नवी दिल्ली - शाहीनबाग परिसरात रविवारी कलम १४४ लागू करण्यात आले. तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्त पाळण्यात आला. शाहीनबाग आंदोलनाविरोधात मदनपूर खादर भागात काही नागरिक आंदोलन करणार, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरला झाला होता. त्यामुळे कलम १४४ लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून शाहीन बाग येथे नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरू आहे. तसेच सीएए समर्थक आणि विरोधक यांचे दोन गट आमनेसामने आल्याने नुकतीच दंगल झाली. यामध्ये जवळपास ४६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्ली पोलीस सावध झाले आहे. शाहीनबाग आंदोलनाविरोधात आंदोलन करणार असल्याचा मेसेज व्हायरल होताच त्यांनी या परिसरात कलम १४४ लागू केले. सोबतच सरीता विहार येथील एम. एन. ब्लॉक येथे कलम १४४ लागू करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील सर्व दुकाने देखील बंद होती. तसेच ठिकठिकाणी पोस्टर लावून लोकांना एकत्रित न येण्याचे आवाहन करण्यात आले.